मम्माईचा मून-चंद्र
लहान मुलांच्या त्या निरागस अबोध वयातल्या अनेक गमती-जमती असतात. नुकतीच बोलायला शिकलेली किंवा शिकत असणारी मुलं असतील तर त्यांच्या गमतींना उधाणच येते. कदाचित ती मोठी झाल्यावर त्यांच्या आणि आपल्या लक्षातही रहाणार नाहीत अशाच हया छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या वयात आणि त्या अवस्थेत त्या आपल्याला कमालीचा आनंद देऊन जातात. अशीच चंद्रा विषयीची निनादच्या बाबतीतली आठवण लिहून ठेवावीशी वाटते. कदाचित मोठा झाल्यावर त्याला सुद्धा आठवायला आणि ऎकायला आवडेल अशीच.....
"मम्माई मम्माई मून-चंद्र गाणं बोलं...."..."मम्माई मून-चंद्र गाणं बोलं...." हे वाक्य मम्माई गाणं सुरु करे पर्यंत म्हणत बसणारा माझा लाडका निनाद.. जाता-जाता ह्या मम्माई विषयी सांगते. दादू-आजींनीं शिकवलेले "मम्मा" आणि आजी-आजोबांनी शिकवलेले "आई" यांची संधी जुळवून बनवलेले "मम्माई" हे माझे सध्याचे नाव. हे लिहिण्याचा आजचा विषय नाही, पण जाता जाता ते सांगणे अपरिहार्य होते. तरं "मून-चंद्र" हे त्याचे सध्याचे दैवत (निनादच्या सध्याच्या भाषेत सर्व गोष्टी त्यांच्या मराठी आणि इंग्रजी शब्द जोडून बनवलेल्या एका संधीयुक्त शब्दाने ओळखल्या जातात.... जसे मून-चंद्र पाणी-वौटर... वगैरे वगैरे ...चुकून तुम्हाला एकच भाषा येत असेल तर? तो तुम्हाला समजेल ह्याची खात्री करुन घेतो.) ..तर निनादला अगदी लहानपणा पासून चंद्राची प्रचंड ओढ वाटते. इंग्रजी भाषेत ह्यालाच आपण attraction म्हणू. बहुतेक माझ्या आठवणी प्रमाणे ५-६ महिन्यांचा असल्यापासून, "चांदोबा-चांदोबा भागलास का?" हे गाणं तो मनापासून ऎकतो. ..आता सव्वादोन वर्षांचा तो ते म्हणतो पण ... ते गाणे त्याला केव्हाही ऎकायला आवडते, अनेक चालीं मधून पण ऎकायला आवडते... लहानपणा पासून आणि साधारण १ वर्षापासून त्याला मून-चंद्र पहायला पण अतिशय आवडतो. गाडीत बसून सतत त्याची नजर आकाशात चंद्र शोधत असते... सर्वात आधी कायम त्यालाच तो दिसतो. चंद्राच्या बारीक मुखड्याचा भास होताच ..." मम्माई मून-चंद्र sss...बघ" असे जोरात ओरडत तो सर्वांना त्याच्या आनंदात सहाभागी करुन घेतो. थंडी मधे इथे बरेच वेळा ढगाळ वातावरण असते तेव्हा "मम्माई चंद्र झोपला आहे, किंवा मम्माई चंद्र ढगांच्या मागे लपला आहे, असे मनाशी पुटपुटतो, मम्माई कडून ते कसे बरोवर आहे ह्याची खात्री करुन घेतो. त्या आकाशातल्या चांदोबाची आई पण त्याला गाणी म्हणत असेल मगं तो झोपत असेल--असे सर्व चांदोबाच्या घराचे आणि परिसराचे चित्र डोळ्यांसमोर आणून त्याचे वर्णन करतो. नुसत्या चंद्रा विषयी कल्पनाच नाही तर चंद्रा विषयीची अनेक विविध गाणि ऎकायला आणि गायला तो उत्सुक असतो. असे का होत असेल आणि चंद्र ही गोष्ट त्याला इतके का भारावून टाकते मला तरी अजून समजलेले नाही. ..मग ती चांदोबा गुरुजींची शाळा असो किंवा निंबोणिच्या झाडा मागचा चंद्र असो, कुठलाही चंद्र त्याला झोपताना शांत करतो ही तर गोष्ट मला जाम गमतीची वाटते. सतत फिरणारा, दंगा-मस्ती करत हिंडणारा निनाद जेव्हा चांदोबाचे गाणे ऎकून शांत होऊन झोपतो तेव्हा मला चंद्र हे शांततेचे प्रतिक आहे ह्याची खात्रीच पटते. .. कदाचित अमेरिकेतला चंद्र प्रदुषण कमी असल्याने जास्त स्वच्छ: पांढरा दिसतो का? असाही एक विचार मनात येऊन गेला आणि निनाद पुण्यात वाढला असता तरी सुद्धा त्याला चंद्रा विषयी इतकीच ओढ असती का? ह्या प्रश्नाचेही ऊत्तर "हो" असेच आले. कारण चंद्गा विषयीची आवड त्याला उपजतच आहे आणि त्याच्याबद्द्लची गाणि आणि गोष्टी ऎकून ती व्रुद्धींगत झाली आहे असेच म्हणावे लागेल....
आता ह्ळूहळू निनादला गुलजार किंवा जावेद अख्तरांचा चंद्रही भासवावा असे मनात येत आहे. त्यामुळे जसजसा निनाद मोठा होईल तसतसे त्याला चंद्रा विषयी अजून गाणि, काव्य, लेखन, अनुभव तर मिळतीलच... पण त्याच बरोब्रर त्याला शांत, निर्मळ मनं आणि चित्तलाभावे हेच मागणे त्या चंद्रा कडे आमच्या दोघांचे असेल.....
--सौ. प्रिया वैद्य
Shrewsbury, MA

No comments:
Post a Comment