Tuesday, February 3, 2009

ranga maazhaa vegalaa

भित्रे, पण रेंगाळणारे ऊन असेच कायम माझ्या खिडकीतूने येते, सोफ्यावर पडलेल्या उशीला कवटाळून बसते, त्याच्या त्या घाबरट पणावर विश्वास ठेवावा वाटत नाही. काहीतरी दडपण घेऊन ते आजकाल येते अशी एक भावना मना मधे होती. ..ह्या सतत बदलणारया मानसिक परिस्थितीवर ते ही आपला पडसाद घालत आहे असे जाणवले. त्या ऊन्हाकडे बघत आज एका office मधल्या मित्रा बद्द्ल आठवण झाली. एका भयानक आजाराशी ११ वर्ष झगडा देऊन शेवटी त्याने प्राण सोडला. बरेच दिवसांपूर्वी email आली होती, तेव्हा कामाच्या गडबडीत मी फार विचार केला नव्हता. वाईट झाले असा एक निश्वास टाकूने पुढे कामाला सुरुवात केली होती. आज मात्र ह्या भित्र्या ऊन्हाकडे बघून त्याची आठवण झाली.....थोडा वेळ हातात असल्याने अर्थातच त्याच्यावर थोडा विचार नकळतच चालू झाला.... इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी का आपल्या मनाचा एवढा पगडा घेतात, हा ओघाने येणारा पुढचा विचार मनात सुरू झाला. उदा. चहा ऊतू गेला म्हणून चिडचिड, रसत्यात समोरचा गाडी इतकी हळू का चालवतो म्हणून चिडचिड, निनाद हट्ट करतो म्हणून चिडचिड....अश्या एक ना अनेक शुल्लक गोष्टींवरून आपण अनेक वेळा चिडत असतो आणि आज ते आठवताना एकदम १०व्या मजल्यावरुन जमिनीवर पडल्यासारखे झाले. रोजच्या धकाधकीच्या आणि कश्याच्यातरी मागे सतत धावण्याच्या/पळण्याच्या या सवईचाच राग आला. केवळ धड-धाकट शरीर आहे म्हणून आणि पळण्याची कुवत आहे म्हणून कशाचेही भान न ठेवता पळणे काय़ उपयोगाचे. जेव्हा भयानक आजार आणि जीवन मरणाचे प्रश्न जवळून दिसतात किंवा ऎकू येतात तेव्हा स्वता:हाच्या या पळण्याची लाज वाटते. कुठेतरी थांबावे आणि सद्य परिस्थितीत आनंद शोधावा असा एक विचार असह्य करतो..आणि मगं आपण किती सुखात आहोत आणि आपल्याकडे आनंद वाटावा आश्या किती गोष्टी आहेत ह्याची यादी मनात चालू होते....अर्थातच लांब लचक यादी बनते..थोडा वेळ त्या मधे जातो... मनाच्या पगड्यात ह्या मी अलगद कशी सरकते,वेळ काळ ठिकाणाचे भान मी विसरते,प्रत्येक माणसामधे असे नाते का मी शोधते,प्रत्येकाचा घाव का मी फुंकरण्या आसुसते... हे सर्व मनात रेंगाळत असतानाच.... "मला एवढ्या दिवसां मधे हे पूर्ण करून पुढे चढायचे आहे....." अश्या पुन्हा धावायला लावणारया विचारांनी मनाचा पगडा कधी घेतलेला असतो कळतही नाही... एका वर्तुळातून बाहेर पडून पुन्हा त्याच वर्तुळात कशी शिरते माझे मालाच कळत नाही..... अशी अलगद वर्तुळात शिरणारी ही मी़च असते आणि स्वत:हाला त्यातून मोकळे करणारी पण मीच असते...अश्या ह्या अडकण्या वरून कवि सुरेश भटांची एक अप्रतिम गझल आठवते.....

रंगुनी रंगात सारया रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात सारया पाय माझा मोकळा

माझ्या वरील लिहिलेल्या सर्व विचारांना एकत्र गुंफणारा हा शेर वाटतो. ही काहीतरी करण्याचॊ धडपड-धावपळ कशासाठी? माझा रंग वेगळा आहे हे दाखवण्यासाठी... पण ते करत असताना आपला पाय ह्या विचारांच्या वर्तुळात गुंतून पण मोकळा ठेवता आला पाहिजे... हे कसे काय करायचे हे ज्याला जमेल तो आनंदी राहील....

-- प्रिया वैद्य

No comments: